समृद्ध जंगलाचा वैभवशाली शाहूवाडी ब्रँड
About the natural treasure of Shahuwadi forest division
Rajendra Lad, Amba
7/18/20261 min read


महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पूर्णत्वास येत आहे, त्यातील १८ गावे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याच्या उत्तरेला आहेत. या प्रकल्पात कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा विस्तीर्ण जंगलपट्टा समाविष्ट असून, एकूण १,१६५.५७ चौ.कि.मी. क्षेत्र यात येते. जैवविविधतेमध्ये जागतिक वारसा स्थळांचा बहुमान मिळालेली अनेक ठिकाणे जिल्ह्याच्या सीमावर्ती जंगल भागात आहेत. त्यामुळे शाहूवाडीच्या पर्यटनात ही समृद्ध जैवविविधता वैभवशाली वारसा घेऊन उभी आहे.
इतिहास आणि निसर्ग यांचा संगम
पन्हाळा–पावनखिंड ही ऐतिहासिक रणभूमी, शाहूवाडीच्या हद्दीवरील किल्ले विशाळगड व प्रचितीगड हे जाज्वल्य इतिहासाचे प्रेरणास्थान आहेत. घाट प्रदेश व कोकणाला जोडणारे आंबा व अनुस्कूरा घाट, विशाळगड–प्रचितीगड परिसरातील घनदाट जंगल, उदगिरी, धोपेश्वर, कांडवण व बर्कीतील सदाहरीत वनराजी हे शाहूवाडीच्या गौरवातील मानाचे तुरे आहेत.
सह्याद्रीच्या माथ्यावर बरसणारा साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस जंगलांचे वैभव वाढवतो, तसेच हजारो गावांना सुजलाम–सुफलाम करून जातो. माथ्यावरील विस्तीर्ण सडे, दऱ्या, कडे, खिंडी, नद्या व देवराया जैवविविधतेने नटलेल्या आहेत. रानफळे, रानफुले, वनौषधी, विविध कंद, दुर्मिळ पशुपक्षी व रानभाज्या – ही संपदा जणू शाहूवाडीची नैसर्गिक ब्रँड ठरली आहे.
श्रद्धा, पर्यावरण आणि संस्कृती
धोपेश्वर येथील पांडवकाळीन मंदिर, येळवणमधील जुगाई मंदिर, उदगिरीतील काळाम्बा मंदिर आणि आंब्यातील अंबेश्वर देवराई, सातेरी – ही श्रद्धास्थळे स्थानिकांच्या श्रद्धेतून जपली गेली आहेत. ती जंगले व पर्यावरणाशी जोडून जगण्याचा संदेश देतात. विद्यापीठीय अभ्यासक, विद्यार्थी व पर्यटक या निसर्गसंपन्न सौंदर्याचा मनमुराद आनंद घेत आहेत.
साहसी पर्यटनाचा वारसा
पन्हाळा–पावनखिंड या ऐतिहासिक युद्धभूमीवर दरवर्षी शिवाजी ट्रेकच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुण साहसी पदभ्रमण करतात. १३ जुलै १६६० रोजी झालेल्या घनघोर लढाईची आठवण जागवणाऱ्या या मार्गावर हजारो तरुण राष्ट्रभक्तीचा संस्कार घेतात. येथील शिवकालीन गनिमीकावा तंत्र आणि मावळ्यांची स्वामीनिष्ठा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरते. कोल्हापूरसह राज्यभरातील विविध संस्था "शिव–पावन" पदभ्रमंती मोहीम राबवून भावी पिढीत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करतात.
सामाजिक चळवळींची परंपरा
विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतील शेवटचे अस्तित्व टिकवून ठेवणारे बर्की भूदान मंडळ याच भागात आहे आणि येथे आजही प्रशासन त्याच तत्त्वांवर चालते. घनदाट झाडीत वसलेला धबधबा जिल्ह्याचे वैशिष्ट्य बनला आहे. मानोली–विशाळगड दरम्यान सह्याद्रीच्या रांगेतील सर्वात उंच पठारावर जमिन मोजणीचा प्रारंभ करणारा ट्रिक पॉइंट येथेच आहे.
विकास आणि पर्यटनाची दिशा
संपन्न जंगलाचा ठेवा असलेला हा भाग निसर्ग, साहस, कृषी व ऐतिहासिक पर्यटनासोबतच जैविक संशोधनासाठीही महत्त्वाचा आहे. दुर्गमता असल्याने औद्योगिकीकरणावर मर्यादा असल्या, तरी पर्यटन व्यवसायातून स्थानिकांच्या अर्थार्जनाला चालना मिळाली आहे. मुबलक पावसामुळे लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांद्वारे जलसंपदा उभारणी झाली आहे.
पावनखिंड–मानोली दरम्यानच्या जंगलातील संपन्न जैवविविधतेला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. दुर्मिळ वन्यजीव संपदा येथे सुरक्षित आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येत येथील जंगल महत्त्वपूर्ण ठरत आहे.
संवर्धनाचे प्रयत्न
गेल्या पाच वर्षांपासून आंबा रिझर्व फॉरेस्ट विभागात शिकारीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने जंगल सुरक्षिततेला गती मिळाली आहे आणि वन्यजीवसंख्याही वाढत आहे. भविष्यात ही जैवविविधता आणि व्याघ्र प्रकल्प शाश्वत विकासाचे साधन बनावेत, यासाठी भूमिपुत्रांनी सजग राहणे गरजेचे आहे.
राजेंद्र लाड, आंबा
Visit our other ventures
Contact
Get in touch
Email - info@shahuwadi.com
Mobile -
© 2010 - 2026. All rights reserved.
