पावनखिंडची पदभ्रमंती मोहीम
इतिहासप्रेमी, हायकर्स, विविध ट्रेकींग संघ यांचेसह कर्नाटक, गोवा व राज्यभरातून सुमारे तीस हजारांवर तरूणांचे थवे पावनखिंडीत दरवर्षी नतमस्तक होतात. जाज्वल इतिहासाचा गजर होतो.पण काहींनी याला वर्षा पर्यटन व इव्हेंट चे रूप दिले आहे.ही मोहीम इव्हेंट न बनता ती राष्ट्र आणि समाजाप्रती कृतीशील कार्य करणारी विचारधारा ठरावी अशी अपेक्षा माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी भुमिका मांडली..विविध संघटना प्रमुखासह, इतिहास संशोधक, आमदार, खासदार, स्वराज्यातील सेनापतीचे वारसदार,शासकीय यंत्रणेची हजेरी लागते. पदभ्रमंती करताना प्रत्येकाने एक झाड या युद्धभूमीच्या वाटेवर लावले तरी पर्यावरण संवर्धनाचे केवढे मोठे काम होवून जाईल.आपल्यामुळेच होणारी प्लास्टीक ची गर्दी आपणच दूर केली तर मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली ही खिंड तितकीच पवित्र राखता येईल.




'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे' हा स्वामीभक्तीचा हुंकार जागविणारी पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती आज राष्ट्रभक्तीची वारी बनली आहे. हाती भगवा झेंडा, मुखी हरहर महादेवाचा गजर करीत पन्नास किलोमीटरची ऐतिहासिक युद्ध भूमीवरील पदभ्रमंती अबाल-वृध्दामध्ये राष्ट्रभक्तीची स्फूर्ती जागवते.
'शत्रूच्या वेढ्यात शिवाजी महाराज अडकले म्हणून पुण्याईचे मरण कवटाळणारे वीर शिवा काशिद यांची देशभक्ती एकिकडे तर दुसरीकडे ' महाराज आपण विशाळगडी जावे आम्ही गनिम्यांना घोडखिंडीत रोखून धरतो. तूम्ही पोहोचल्याची तोफांची इशारत होत नाही तोपर्यंत जीव सोडत नाही ' असा शब्द देत बाजीप्रभू नि त्यांच्या तीनशे बादल सेनेने दहा हजार गनीमांना रोखत घोडखिंड अतुलनीय पराक्रमाने पावन केली.
१२ जूलै १६६० ची रात्र धडाडणाऱ्या पावसात पराक्रमाची शर्थ करणारी ठरली. त्या शौर्याची प्रेरणा हजारो इतिहास प्रेमी पदभ्रमंतीमधून घेतात. तसेच दरवर्षी नोव्हेंबर मध्ये शिवाजी ट्रेल ट्रेक ही राष्ट्रीय स्तरावरील मोहीम याच ऐतिहासिक मार्गावर होते. देशभरातील हजारो प्रशिक्षणार्थी येथून देश रक्षणाची स्फूर्ती घेवून जातात.
भोज राजाने किल्ले विशाळगडची नवव्या शतकात तर पन्हाळ्याची दहाव्या शतकात उभारणी केली. त्यानंतर शिवरायांनी स्वराज्याच्या विस्तारात या गडांची डागडूजी करून गडवैभव जपले. मराठेशाहीतही या गडांचे मोठे योगदान राहीले. सह्याद्रीच्या रांगेतील पन्हाळा ते विशाळगड दरम्यानच्या या युद्धभूमीत तुरूकवाडी, म्हाळूंगे, मसाई पठार, कुंभारवाडी, मांडलाईवाडी, कर्पेवाडी, खोतवाडी, आंबेवाडी, माळेवाडी, रिंगेवाडी, पार्टेवाडी, केळेवाडी, म्हाळसवडे धनगरवाडा, पांढरपाणी, मालाईवाडा, भाततळी, केंबुर्णेवाडी, गजापूर व विशाळगड या वस्त्या आजही मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत.
पन्हाळगडी नगरपालिका असल्याने तेथे शिवा काशिद व बाजीप्रभू यांची स्मारके स्फूर्तीस्थाने बनली आहेत.पण पावनखिंड,विशाळगड मात्र विकासाकडे नजर लावून आहे.शिवसृष्टी प्रकल्प , धारकऱ्यांना विश्रांती गृह, इतिहास संशोधक केंद्र, शिवकालीन साक्षीदार यांच्या उभारणीतून येथे पर्यटन बहरेल नी स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळेल. साहजिकच वयोवृध्दांना डोंगरात सोडून रोजगारासाठी शहराकडे धावणाऱ्या तरूणाईचे स्थलांतर रोखता येईल.
सह्याद्रीच्या रांगेत अडगळीत पडलेल्या वस्त्या,शेती ,ऐतिहासिक ठिकाणे यांचे रूप पालटण्यासाठी बालविवाह प्रतिबंध पासून हक्काचे शिक्षण व आरोग्य, पाणी,वीज, जलसंधारण, दळणवळण या मुलभूत सुविधा राबवव्या लागतील. सामाजिक जाणीवेतून परीवर्तनाची दिशा देता येईल. लोकप्रतीनिधी व शासकीय यंत्रणेचा पुष्पचक्र अर्पण करण्यापूरता स्मृतीदिन न राहता शाश्वत विकासाची पायवाट मळणारी भूमिका घेण्याची गरज आहे.
पन्हाळा- विशाळगड दरम्यान पन्नास किलोमीटरची युद्धभूमी जैवविविधतेने समृद्ध आहे. हा परीसर पावसाचे आगार आहे. पण ऐन उन्हाळ्यात येथे पाणी टंचाई पाचवीला पूजलेली. पावसाचे पाणी जमिनीत मुरवणारे जलसंधारणाचे शाश्वत काम राबायला हवे. जंगलपूरक शेती, रानभाजी लागवड, प्रक्रीया उद्योग यातून स्थानिकांच्या हाती रोजगाराची नवी साधने देता येतील.
चांदोली व राधानगरी अभयारण्याला जोडणारा हा जैवविविधतेचा कॉरिडोअर आहे. पण रिंगेवाडी, गिरगाव, घुंगरू येथे बॉक्साईट उत्खननाला परवाने देवून ऐतिहासिक व जैविक वारसा अडचणीत लोटला आहे. उत्खननामुळे वन्यजीवांचा अधिवास विस्कळीत झाल्याने, जंगली प्राणी वस्ती आणि शिवाराकडे वळल्याने मानव आणि वन्यप्राणी असा संघर्ष वाढताना येथील शेती संपली आणि स्थलांतर वाढले. त्यामुळे भविष्यात पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प होणार नाहीत याबाबतची जागृती जाणत्या मंडळींना लावून धरावी लागेल.
रायगड विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर पन्हाळा, पावनखिंड व पूढे विशाळगड या ऐतिहासिक युद्ध भूमीच्या विकासासाठी आणि प्रेरणादायी इतिहासाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
हिंस्त्र श्वापदा समवेत पिढ्यानपिढ्या जगणारा इथला वनवासी, इतिहास प्रेमी, धारकरी व लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने समृद्ध झाला तर इथल्या मातीत स्वराज्याची पुन्हा पाऊले उमटतील.
समाजभान ठेवून काही मंडळी भ्रमंती मार्गावरील वस्त्यामधून खाऊ आणि शैक्षणिक साहीत्याचे वाटप करतात. पण स्थानिक गरजा समजून घेऊन शाश्वत काम हाती घेणारी सार्वजनिक विकासाची चळवळ उभी केली तर पदभ्रमंती पायवाट न राहता विकासाचा राजमार्ग बनेल, त्यासाठी इथल्या रहिवाशांच्या वेदना सजग डोळ्याने पहाव्या लागतील.
- श्री राजेंद्र लाड, आंबा.
आमचे ध्येय
शाहूवाडी या जगप्रसिद्ध पश्चिम घाटात वसलेल्या, दुर्गम डोंगराईने आणि वनसमृध्दीने व्यापलेल्या आपल्या तालुक्याची माहिती आणि माहिती जगापर्यंत पोहोचवणे.
या परिसरामध्ये असलेल्या ऐतिहासिक तसेच धार्मिक वारशाची सर्वाना ओळख करून देणे. तसेच आपल्या तालुक्याने जगाला दिलेल्या व्यक्तिमत्वांची ठळकपणे मांडणी करणे.
आमचे साथीदार
शाहूवाडीबद्दल ज्यांच्या मनात जिव्हाळा आहे असा प्रत्येक जण या उपक्रमाचा साथीदार आहे असे आम्ही मानतो. मुळात हे काम कुणा एकट्याचे नसून सर्वच समविचारी व्यक्तींनी एकदिलाने करण्याचे आहे.
अर्थात, तहहयात सुरु राहणाऱ्या या कार्याची पूर्ती सोबत येणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीने होईल यात शंकाच नाही. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या सकारात्मक गोष्टी आम्हाला जरूर कळवा.
सहभागी व्हा
अधिक माहितीसाठी कृपया 9423859848 या क्रमांकावर फोन कॉल अथवा व्हाट्सअप द्वारे संपर्क साधा.
अथवा इथे ईमेल करा - info@shahuwadi.com


Shahuwadi.com
Explore the bravery and natural beauty of Shahuwadi.
Contact
Get in touch
Email - info@shahuwadi.com
Mobile -
© 2025. All rights reserved.