अंबेश्वर देवराई: संपन्न जैवविविधतेचा वारसा
देवराई म्हणजे आपल्या पूर्वजांची अत्यंत श्रद्धापूर्वक जपलेला गावातला असा परिसर ज्याच्या मध्यभागी एखादे मंदिर असते. तो सर्वच परिसर मंदिरातील देवाच्या नावानेच ओळखला जातो. देवराईतील झाडे तोडण्यास मनाई असते. कदाचित या श्रद्धांचा भक्कम आधार असल्यानेच देवराया पिढ्यानपिढ्या जपल्या गेल्या. आपल्या जगण्याचा मुलाधार झाल्या.




आंबा बसथांब्यापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मोकळ्या माळरानावर दाट झाडीने नटलेली, निसर्गरम्य आणि पावन अशी अंबेश्वर देवराई नजरेस भुरळ घालते. देवाच्या नावाने राखलेली राई, म्हणजेच देवराई - गावाच्या ग्रामदैवताच्या श्रद्धेने व पावित्र्याने जपलेला हा जंगलपट्टा, गावकऱ्यांच्या पर्यावरणीय जाणीवेचा जिवंत पुरावाच आहे. याच देवराईवरून ‘आंबा’ हे गावाचे नाव पडले, ही गोष्ट लक्षवेधी आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेली अनेक गावं ही देवराईची परंपरा पिढ्यान्पिढ्या जपत आली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापूर-रत्नागिरी सीमेवरील आंबा गाव. गावाच्या काठाशी चार हेक्टर क्षेत्रात पसरलेली ही घनदाट राई, शिवभक्तांपासून वनस्पती संशोधकांपर्यंत सर्वांसाठी एक पवित्र व प्रेरणादायी निवासस्थान आहे.
देवराईच्या प्रवेशद्वारावर झाडांच्या फांद्या कमानीसारख्या वाकलेल्या असून त्यावर वेलींनी विणलेली निसर्गनक्षी सौंदर्य खुलवते. आत पाऊल टाकताच पक्ष्यांच्या किलबिलाटाने स्वागत होते. घनदाट वृक्षराजीतून निर्माण होणारा थंडगार गारवा, जणू एसीलाही लाजवेल असा! शंभर वर्षांहून अधिक जुन्या डेरेदार झाडांवर लपेटलेले शेवाळ, आणि त्यांच्या सान्निध्यात वावरणारे विविध पक्षी या देवराईचे वैशिष्ट् आहे.
किंजळ, हुंबर, बकुळ, हिरडा, सोनचाफा, आंबा, फणस, रातांबे यांसारख्या झाडांच्या संगतीने चालताना उजव्या हाताला एक पाण्याची टाकी लागते. तेथे मुंग्या, मधमाश्या, व विविध प्राणी-पक्ष्यांसाठी उभा केलेला पाणवठा निसर्गाशी समरस होण्याची संधी देतो. पायावर पाणी घेऊन वर पाहिले, की मंदिराचा कळस नजर भिडवतो. चारही बाजूंनी झाडांनी वेढलेले असूनही, सूर्यकिरण फक्त मंदिरावर अभिषेक घालतात, असे भासते. मंदिर पूर्वाभिमुख असून, त्याच्या प्रांगणात तुळस, छोटेखानी पण देखणी दीपमाळ, झाडांच्या सावलीत काही प्राचीन मूर्ती आणि विरगळ इतिहासाच्या खुणा जपून उभ्या आहेत.
या जागेचा इतिहास रोमांचकारी आहे. शिवकालीन परंपरेशी निगडित असलेला हा परिसर, झाडांच्या मुळाशी इतिहास जपून आहे. मंदिराच्या सभामंडपात नंदी असून, गाभाऱ्यात दक्षिणोत्तर विसावलेले प्राचीन शिवलिंग आहे. सोमवार या दिवशी गावकरी भक्तिभावाने येथे दर्शनासाठी येतात. “हर हर महादेव!” चा घोष करताना निसर्गदेवतेलाही साष्टांग नमस्कार घालावासा वाटतो, आणि एक दिव्य ऊर्जा अंतर्मनात संचारते.
महाशिवरात्र आणि नवरात्र उत्सव येथे दरवर्षी उत्साहात साजरे होतात. सभामंडपातील नंदीमागे ध्यानस्थ बसल्यावर मिळणारी शांतता क्षणात समाधिस्थ करते. विशाळगड संस्थानकालीन पंतप्रतिनिधीनी मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. तेव्हाचे कौलारू मंदिर देवराईच्या झाडांतून डोकावणारा चांदणेप्रकाश वाटायचे. अलीकडील काळात ग्रामस्थांनी सरकारी निधीतून मंदिराचा पुन्हा एकदा जिर्णोद्धार केला. फरशीचा रस्ता झाला असला, तरी त्यावर साचलेले शेवाळ थोडं धोकादायकही ठरते.
या देवराईत सप्तरंगी वेली, गवतांचे प्रकार, बुरशी, शेवाळ, विविध पक्षी, सरपटणारे प्राणी, गवे इत्यादींची वस्ती आहे. पावसाळ्याच्या आगमनासोबत येथे रानफुलांचा आणि रानभाज्यांचा बहर सजतो. काजव्यांचा दीपमाळेप्रमाणे सजलेली ही राई, पावसात टिपटिपते आणि विविध कंद, फळं-फुलांनी नटते. दरवर्षी विद्यार्थी आणि संशोधक येथे प्रकल्पासाठी भेट देतात, हे याचे वैज्ञानिक महत्त्व दर्शवते.
करवीर निवासिनी ग्रंथात अशी आख्यायिका सापडते की, कोल्हापूरची अंबाबाई या गावच्या रक्षणासाठी येथे आली होती. यासंबंधीची माहिती आणि शिवकालातील घटनांचा उल्लेख पुढील भागात सविस्तर करता येईल.
तोपर्यंत, या देवराईचा निसर्गरम्य सौंदर्य, आध्यात्मिक शांती व जैवविविधतेचा ठेवा आपल्या मनात साठवण्यासाठी, आंबा गावास आणि अंबेश्वर देवराईस अवश्य भेट द्या!
लेखक - श्री. राजेंद्र लाड, आंबा.
Shahuwadi Heritage
Shahuwadi, a taluka rich in bravery and natural treasures, lies in the western part of Kolhapur district, bridging Kolhapur and Konkan.
Nature
Shahuwadi, Kolhapur, India
Bravery
9 AM - 5 PM
Shahuwadi.com
Explore the bravery and natural beauty of Shahuwadi.
Contact
Get in touch
Email - info@shahuwadi.com
Mobile -
© 2025. All rights reserved.