लगीन कुठं बी करा, मांडवात करा, देवळात करा, नाहीतर कोर्टात करा, पण गावाला बकरं जेवाय घातल्या बिगार.... लगीन कार्य पुरं झाल्यासारखं हुईत न्हाई.

Marriage ceremony in villages during 80s.

तुक्याची मेख

Tukaram More

7/19/20261 min read

लगीन कुठं बी करा, मांडवातकरा, देवळात करा, नाहीतर कोर्टात करा, पण गावाला बकर जेवाय घातल्या बिगार.... लगीन कार्य पुरं झाल्यासारखं हुईत न्हाई.

ह्या जेवणाचा बेत रात्रीचाच... पंगतीला दोन रवं आणि एकांद हाडूक आसुदे.. पण जेवाय आक्खा गाव झाडून आसणार. आहो ही गावची रीत, आकंड गावाला एकत्र आणतिया.

आणि जेवणाला चव.... अगय्यायाया.. नाद्याखुळाच. गावठी तांदूळ,,, जेवडं मिळाल्यातय ठेवढच मसालं, वाईचसं त्याल. आणि गावाच्या मातीतलं पाणी.. आर्रर्रर्रर्र यातन जी जेवणाला चव येतीय ती शब्दात सुद्धा सांगता येणार न्हाई..

ह्या जेवणाची सर फाईव्ह स्टार हाटीलातल्या जेवणाला येणार न्हाई बघा.

शेणाणं सारिवल्यालं आंगाण त्यावर मांडी घालून जेवाय बसायचं.. जेवणाचं आचारी मंडळी गावातलीच माणसं. हे आमचं शामू आबा अखंड निनाई परळ्याच्या पंचक्रोशीत हेंच्या सारखी जेवणाला भारी चव कुठंबी न्हाई. पंगतीला बसलेल्या प्रत्येकान कमीत कमी तीनदा भात घ्यालाच पाहिजे. जेऊन झाल्याव हाताची बोटं बी चोखायला पाहिजेत. लग्नाच्या गर्दीव नजर टाकून तांदूळ शिजाय घालणारा ह्यो माणूस.. शिक्षण पहिली नापास.

ही काय काय बुजुर्ग मंडळी दिसत्यतय न्हवं.. आहो ह्यांनी ह्यांचा काळ लय गाजीवलाय बघा. आतां पळीनं भात वाढत्यतय.. पूर्वी दोन्ही हातांनी बचाकभर भात वाढायचा पत्रावळी फुल्ल भरलीच पाहिजे. कोरड्याश्याला हातानं आळं करायचं. कोरड्यास घेतल्यावर भात कालवायचा आणि द्याचा रट्टा लावून. असा तीन वेळा भात घ्याचा. बुट्टीभर भात फस्त करणारी ही माणसं सुखापाटालाला भी जड जातील.

जो लगीन मालक हाय त्यानं फक्त खांद्याव टावील टाकून आपली पावणीमाणसं जेवलीत का एवढंच बघायचं कारण सगळी माणसं जेवून उठीवनं हेचि जिम्मेदारी भावकीनं आणि गावकीनं खांद्याव घेतलेली असतीय.

बारक्या पोरांची पाणी वाढायची लुडबुड आधी मधी चालूच. आहो हे लय महत्वाचं हाय कारण उद्याचं गावातलं वाढपी यातनचं तयार हुत्यात.

हे आमच्या गावचं आनंदराव चेरमन.. आत्ता ही वाटीतन मटण वाढायची पद्धत आली त्याआधी पळीनं आणि त्याच्याबीआधी हातानंचं वाढायची पद्धत हुती. खरं मापात पाप आज्याबात न्हाय. तोंडं बघून वाढणाऱ्याच्यातला अंदुआबा न्हाई. पंगत उठल्यावर पत्रावल्या गोळा करायचं महान काम बी ह्यो मनापासनं करतो. हे सगळं मानापानासाठी करीत न्हाई बरं.. अंदुआबाचा स्वभावच हाय ह्यो. प्रत्येक गावात असा एखादा कार्यकर्ता असतोच असतो.

आहो या गावाच्या जेवणात नुसती चव नाही मित्रानो.. आठवणी असत्यात, आपळलेपणा असतो, संस्कार असतो, आणि मनाला समाधान देणारी ओढ असते.

तुक्याची मेख

(ओजस युनिव्हर्सिटी)