मजूर टंचाईने दिली ‘पैरा पद्धती’ला संजीवनी

परंपरागत आणि परस्पर सहकार्यातून सर्वांगीण विकास साधणारी शेतीची 'पैरा पद्धती'.

AGRICULTURE OF SHAHUWADI

Rajendra Lad

7/30/20261 min read

आंबा : ग्रामीण भागात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या मजूर टंचाईमुळे एकेकाळी लुप्त झालेली ‘पैरा पद्धत’ पुन्हा नव्याने रुजताना दिसते. शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाल्याने शेतकरी आता परस्परांच्या शेतात श्रमदान करून कामे पूर्ण करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत.

पूर्वी चलन व्यवहार मर्यादित असताना बारा बलुतेदारी व्यवस्थेत परस्परांच्या श्रमांची आणि उत्पादनांची देवाणघेवाण करीत असे. विश्वासाच्या नात्यावर आधारित ही पैरा फेडण्याची पद्धत ग्रामीण संस्कृती बनली होती. मात्र काळाच्या ओघात रोखीच्या व्यवहारामुळे ही परंपरा मागे पडली.

गेल्या दोन-तीन वर्षांत मात्र शेतीकामासाठी मजूर मिळणे मोठे आव्हान बनले. शिक्षणामुळे तरुण पिढी शेतीतील कष्टाच्या कामांपासून दूर जात असून, विविध शासकीय योजनांमुळेही ग्रामीण भागात मजुरांची उपलब्धता कमी झाली .

या पार्श्वभूमीवर "आज आम्ही तुमच्या शेतात, उद्या तुम्ही आमच्या शेतात" या परतफेडीवर शेतकरी कुटुंबांसह एकमेकांच्या शेतात काम करत आहेत. या पद्धतीमुळे मजुरीचा खर्च कमी होत असून शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत होत आहे.

शाहूवाडी तालुक्यातील तरुणाई मुंबई पुणे गोवा व दूबई भागात पोटापाण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत आहे . त्यामुळेही या भागात पैरा पद्धतीला पसंदी मिळत आहे .

परस्पर सहकार्य, विश्वास आणि सामुदायिक एकोप्याचे प्रतीक असलेली पैरा पद्धत पुन्हा बळकट होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसते . मजूर टंचाईच्या संकटात ही परंपरा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरताना दिसते .

राजेंद्र लाड, आंबा.