वारीतील गावकरी... विठुरायाच्या भेटीची आस धरी!

महाराष्ट्राच्या गाव खेडयातून पंढरीच्या दिशेने चालणाऱ्या दिंड्या गावोगावच्या सिमा हरीनामाने सजवित आहेत . खांदयावर भागवत पताका नि गळ्यातील  विना सांभाळणाऱ्या मंडळीचे ताफे पहावयास मिळत आहे . वारीत सहभागी होता येत नसेल तरी एकादशीचा उपवास प्रत्येकाच्या हृदयी भक्तीचा महिमा रुजवत आहे

RELIGIOUS SHAHUWADI

Rajendra Lad, Amba

7/14/20261 min read

महाराष्ट्राच्या गाव खेडयातून पंढरीच्या दिशेने चालणाऱ्या दिंड्या गावोगावच्या सिमा हरीनामाने सजवित आहेत . खांदयावर भागवत पताका नि गळ्यातील विना सांभाळणाऱ्या मंडळीचे ताफे पहावयास मिळत आहे . वारीत सहभागी होता येत नसेल तरी एकादशीचा उपवास प्रत्येकाच्या हृदयी भक्तीचा महिमा रुजवत आहे.

वारीतील गावकरी हा गावच्या अध्यात्मिक परंपरेचा स्वयंस्फूर्त वाहक असतो. गावचे भजनी मंडळ, पारायण सोहळा, यात्रा आणि सामूहिक भक्तीच्या माध्यमातून तो गावकऱ्यांना एका पताके खाली बांधतो. नामस्मरणाच्या गजरात पंढरीची वाट चालताना तो संतसंग, सेवा, आणि शिस्त यांचे संस्कार अंगीकारून. विठ्ठलभक्तीची ही शिदोरी घेऊन परतलेला वारकरी गावच्या अध्यात्मिक वारशाचा पाईक बनतो आणि वारीतील संस्कार नव्या पिढीत रुजवण्यासाठी समाजप्रबोधनाची पाऊलवाट मळतो.


कोल्हापूर पुरोगामी आणि अध्यात्माशी ही जोडलेले आहे . पंढरीची वारी असो की रविवारचा जोतिबा डोंगरावरचा खेटा असो आपआपल्या परीने ईश्वरी स्मरण जागवणारी मंडळी सांप्रदायच्या व गावच्या अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत आहेत . आणि त्यातून हरहुन्नर अबालवृद्ध आत्मनंदाची नि शांततेची जपमाळ जपत आहेत . पुरोगामी विचारांची दिशा आणि अध्यात्मिक मूल्यांची प्रेरणा अंगिकारणारी मंडळी निकोप समाज व्यवस्थेत ऊर्जा भरताना दिसतात. दिंडीत सामील होताना पांडुरंगाला माझा नमस्कार कळवा म्हणून गावच्या सीमेवर त्यांचे चरणस्पर्श होते. पंढरीतील भक्तीचा सुगंध त्या वारकऱ्यांच्या रूपाने गावच्या मातीत दरवळत राहतो. त्या वारीतील एक एक विठ्ठलभक्त प्रत्येक गावाचे प्रतिनिधित्व करीत वारीमय होतो, पांडुरंगाचा आशीर्वाद घेतो अन परतुनी जाताना वारीतील मानवतेचा वसा घेऊन परततो.


गावात येताच पंढरीचा प्रसाद पंगत त्याच्या घरी सजते. त्याच्या रूपात गावकरी विठ्ठलाचे दर्शन घेतो. तिथे जात-पंथाची नि गरीब-श्रीमंतीची कवच कुंडले गळून पडतात. मानवतेचा एक समान संस्कार तिथे अध्यात्माची शाश्वती उभी करतो.

वारकऱ्याच्या गळ्यातील पंढरीची माळ समाज मनात आदर्शवादी आचारसंहितेचा हुंकार जागवते. अख्ख गाव वारीत नसलं तरी त्या माऊलीच्या रूपाने गावचे केलेले प्रतिनिधित्व वारकऱ्यांचा सन्मान मिळवून देते. त्यांच्या नेतृत्वाखालील भजनी मंडळातील ज्ञानोबा-तुकारामाच्या अभंगांचा गजर गावोगावच्या सिमा सलोख्याच्या धाग्यात गुंफतात . व्यसनाधीन मंडळीपुढे गळ्यात पंढरीची माळ घातलेल्या माऊलीला उपदेशाचे अधिष्ठान मिळवून देते. गावच्या वेशीवरच्या ढाबा संस्कृतीला छेद देण्यास याच वारकरी सांप्रदायाचा आदर्श समोर ठेवला जातो.


' पंढरीची वारी, आहे माझ्या घरी.' असा जयघोष करीत एका वारीतील सहभागाच भाग्य ती माऊली अभिमानाने जपत राहते. काही गावं, काही वस्त्या अख्या वारकऱ्यांच्या गोतावळ्यात बांधल्या आहेत. तिथे अबाल- वृद्धाचे चरण स्पर्श नि माऊली ची साद नित्यक्रम अनुभवतो. गावच्या ग्राम मंदिराच्या काकड आरतीने त्या गावची सकाळ उजाडते. तर भजनाच्या गजराने भक्ती रसात रात्र न्हाते.'माऊली कसं चालंलय' अशी प्रत्येकाकडूनच आपुलकीची विचारपूस घडते. मुखी ज्ञान माऊली, कपाळी काळा बुक्का, गळ्यात वारकरी माळ, सफेद टोपी नि सदरा हि वारकऱ्यांची खूणगाठ जपणारे वारकरी गावच्या संस्काराचे स्त्रोत बनू पहात आहेत.


पंढरीच्या वारीचा वसा घेऊन गावचा वारसा बनलेली ही मंडळी अध्यात्माची पताका खांद्यावर घेऊन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संवेदनशील मनाची जडणघडण आणि सामाजिक भान समाजात पेरीत आहेत. वारीच्या वाटेवरील प्रत्येक पावलावर मिळालेली शाश्वत भक्ती, सेवाव्रत, निष्ठा आणि माणसांतले देवत्व याची ज्योत एका पणतीपासून दुसऱ्या पणतीला प्रज्वलित करण्यात धन्यता मानताना दिसतात.

'जगात भारी पंढरीची वारी' गावच्या रहाटगाड्याचा जीवनप्रवास सात्वीक बनवते. बहुजनांचा तारणहार, मायबोलीतील भक्तीला आसुसलेला पंढरीचा राजा आणि गावची भक्ती यांचा सेतू बनलेला वारकरी दरवर्षी दिंडीची आस धरून राहतो. आणि म्हणूनच पंढरीच्या वाटेवरची पाऊले प्रतिवर्षी वाढताना दिसतात.

दरवर्षी गावोगाव ज्ञानेश्वरी पारायणे, सप्ताह वारकऱ्यांकडून होताना दिसतात. काही गावांनी पारायण सोहळ्याचे सुवर्ण महोत्सव साजरे केलेत. या कार्यक्रमांसाठी प्रबळ दातृत्व उभे राहत आहे. किर्तने, प्रवचने, हरिपाठ, दिंडी अशा भक्तीमय सोहळ्यात संपूर्ण गाव न्हाऊन निघते. या कार्यक्रमामध्ये माळकऱ्यांसोबत गावातील इतर मंडळीही सहभागी होतानाचे सकारात्मक चित्र आहे. अनेक लोक पारायणाच्या निमित्ताने गळ्यात विठ्ठलाची माळ घालतात. साहजिकच व्यसनाधीनतेपासून दूर जाऊन लोक शाकाहार स्विकारू लागले आहेत.
ग्रामीण जीवन घडणीत या अध्यात्माचा मोठा मोलाचा वाटा आहे. काही खेड्यांमध्ये प्रत्येक एकादशीला गावच्या मंदिरात गावातीलच भजनी मंडळे भजन करतात. त्यातून पखवाज, तबला, सुरपेटी वाजवणारे, गाणारे नि प्रवचन करणारी व्यक्तीमत्वे घडत आहेत.
गावांतील वास्तुशांती, सत्यनारायण पूजा, वार्षिक भंडारा, गणेशोत्सव, नवरात्र उत्सवाला भजन किर्तनाचा बाज मिळू लागला आहे. गावचे वातावरण आध्यात्मिक ठेवण्याचे काम वारकऱ्यांतून होताना दिसते. संतांची कृती, त्यांचे संत वागःय, मानवी जीवनाचे मोल वाढवणारे ठरत आहे.

निवळी प्रमाणे वारकरी गावात पावित्र्य आणि चैतन्य फुलणारी फुंकर मारीत आहेत. वारकरी सांप्रदाय सेवा, भक्ती आणि निष्ठेचा वारसा जपून आहे.  पंढरीच्या वारीने दिलेला सहजीवनाचा मंत्र गावची अस्मिता जपताना दिसतो. एकीकडे सत्तेसाठी वाटमारीपासून ते क्षेपणास्त्रापर्यंत वापर होत असताना पंढरीच्या वाटेवर मात्र संत संस्कार मानवी अस्तित्वाची शाश्वती पेरीत आहे.

- श्री राजेंद्र लाड, आंबा.