शिवरायांच्या जयघोषात पावनखिंडीत शौर्याला मानवंदना

पावनखिंड येथे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या ३६६ व्या . पुण्यतिथी निमित्य त्यांच्या समाधीवर प्रांताधिकारी समिर शिंगटे, तहसिलदार शुभांगी जाधव जि.प. सदस्य स्नेहल वेल्हाळ यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदन केले

HISTORY OF SHAHUWADI

Rajendra Lad, Amba

7/13/20261 min read

आंबा : स्वामीनिष्ठा, राष्ट्रभक्ती आणि शौर्याचा जागर करत शिवरायांच्या जयघोषाने आज पावनखिंड परिसर दुमदुमून गेला. शेकडो शिवभक्तांनी पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावर पदभ्रमंती करत वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केले.

कोल्हापूर येथील सह्याद्री प्रतिष्ठान आणि आनंदराव पवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या धारकऱ्यांनी युद्धकलेचे प्रात्यक्षिक ,पालखी सोहळा सादर करत शौर्यभूमीला मानवंदना दिली.

सकाळी नऊ वाजता शाहूवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार शुभांगी जाधव, महसूल नायब तहसीलदार प्रदीप जाधव, निवडणूक नायब तहसीलदार नरेंद्र गायकवाड आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून शासकीय यंत्रणेच्या वतीने अभिवादन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल वेल्हाळ, पंचायत समिती सदस्य सुरेश पवार, सरपंच चंद्रकांत पाटील, उद्योजक केतन वेल्हाळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी शासकीय परिसरात वृक्षारोपण झाले.

दुपारच्या सत्रात बांदल बंधूंनी पावनखिंड येथे आणलेल्या पालखीचे विधिवत पूजन केले. संपूर्ण सोहळा शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भक्तिमय आणि राष्ट्रप्रेमाच्या वातावरणात संपन्न झाला.

पावनखिंड येथे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या ३६६ व्या . पुण्यतिथी निमित्य त्यांच्या समाधीवर प्रांताधिकारी समिर शिंगटे, तहसिलदार शुभांगी जाधव जि.प. सदस्य स्नेहल वेल्हाळ यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदन केले.

गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी पावनखिंडीत वृक्षारोपण केले