ग्रेट भेट 🌾 राधिका...🏃

शालेय स्तरावर चौथीपासून रनिंगमध्ये आघाडीवर असलेली; आयुष्य खडतर असताना देखील स्वतःमधील क्रीडागुण जपणारी, यशाचं स्वप्न पाहणारी राधिका!

Amit gadre

11/19/20261 min read

"ही माझी राधिका. शाळेत आणि आता राज्य पातळीवर रनिंगमध्ये एक नंबर आणि अभ्यासात वर्गात पहिला तीन मध्ये.. आमच्या कुटुंबाचा अभिमान.हिला मी आयपीएस करणारच"... हे बोल आहेत एका आईचे..

माझ्या आंबा गावातील एक कोरडवाहू महिला शेतकरी रूपाली पाटील. आज तासभर रूपाली ताई आणि त्यांची आठवी इयत्तेत शिकणारी मुलगी राधिका हिच्याशी अंगणात गप्पा झाल्या.

चर्चेत एकदम ग्रामीण भागातील रूपालीताई जेव्हा राधिकाला आयपीएस करणार म्हटल्यावर मी चमकलोच. ग्रामीण भागातील हुशार मुली एकतर कॉमर्स, सायन्स, नर्स असे काही तरी उत्तर देतात. मी नकळत रूपाली ताईंना विचारले, आयपीएस चे स्वप्न कसे काय ठेवले ?

ताई म्हणाल्या , की टीव्ही मालिकेत मी आयपीएस अधिकारी आणि तिचा दरारा, मान सन्मान पाहिला होता, आणि राधिकामध्ये मी आयपीएस पहाते.

आंबा गाव फिरताना कळत नकळत काही रत्न हाती लागतात, त्यापैकीच ही राधिका. माझ्या भावाची ही विद्यार्थिनी. सुनील म्हणाला, की राधिकाने आमच्या शाळेचे आणि गावाचे नाव आज राष्ट्रीय पातळीवर नेले आहे. हिचे आई, वडील घरापुरती भात शेती करून रोजंदारी करतात. कष्टाळू आणि मुलांच्या शिक्षणाची चांगली चिंता असलेले कुटुंब आहे. या मुलीची धडपड लोकांच्या समोर आली पाहिजे आणि मी आज थेट राधिकाचे घर गाठले.

शालेय स्तरावर चौथीपासून रनिंगमध्ये आघाडीवर असलेली राधिका तालुका, विभाग आणि जिल्हा पातळीवर देखील अनवाणी पायांनी धावत पहिल्या दोन क्रमांकावरच होती. तिसरा क्रमांक तिला माहीत नाही. तिची मेहनत पाहून शाळेतील शिक्षक आणि आई, वडिलांनी पोटाला चिमटा काढून तिला स्पर्धेसाठी ड्रेस, विशेष प्रकारचे बूट घेऊन दिले. आणि राधिकाने जिद्दीने राज्य पातळीवर रनिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळवून आता येत्या महिन्यात हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ट्रायथलॉन स्पर्धेत धावणार आहे.

पी टी उषा ,मिल्खा सिंग आणि उसेन बोल्ट हे तिचे आवडते खेळाडू आणि तिचे ध्येय आहे ऑलिम्पिक स्पर्धा. येत्या पाच वर्षांत राधिका भारतीय रिले संघात असणार हे नक्की...

आम्ही सर्वजण शैक्षणिक आणि आर्थिक मदतीला तिच्या सोबत आहोतच, आपणही साथ द्या.

आजचा दिवस काही वेगळाच होता...

- अमित गद्रे, आंबा

१९/११/२०२६