बर्कीचा धबधबा, भूदान चळवळ आणि विनोबा भावे

शाहूवाडी तालुक्यातील बर्कीचा धबधबा धो.. धो होऊ लागला की या गावाकडे पर्यटकांचाही लोंढाच्या लोंढा वाहू लागतो. हा धबधबा ऐन भरात आला आहे. अर्थातच हौसे, नवसे, गवसे यांची मोठी गर्दी धबधब्यावर झाली आहे. धबधबा परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवायची वेळ आली आहे. हा धबधबा समोर दिसला की कधी एकदा धबधब्याच्या धारांखाली आपण जाऊ, असे वाटण्यासारखे जरूर तेथे आकर्षण आहे. पण ज्या बर्की गावात हा धबधबा वाहतो त्या गावाचा इतिहासच या धबधब्याच्या लोटातून वाहून गेला की काय, असे म्हणण्यासारखी या गावची आता परिस्थिती झाली आहे.

 - सुधाकर काशीद, कोल्हापूर.

धबधबा म्हणजे बर्की गाव नव्हे, तर आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला जमिनी दान करणारे हे जिल्हयातील गाव आहे. त्यामुळे या गावातील सर्व शेतजमिनी शासनाच्या हक्कात आहेत. गावात 'ग्रामपंचायत नव्हे, ग्रामदान मंडळ' स्वातंत्र्य मिळाल्यापासून अस्तित्वात आहे. भूदान चळवळ केवळ भाषणबाजीतून करण्याऐवजी या गावच्या तत्कालीन ग्रामस्थांनी जमिनी भूदान भूदान चळवळ, विनोबा भावे आणि बर्कीचा धबधबा चळवळीला देऊन इतिहास निर्माण केला आहे. पण बर्की गावात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी झुंडीने येणाऱ्यांना बर्की म्हणजे फक्त धबधबा एवढेच माहिती आहे. भूदान चळवळ, विनोबा भावे ही नावे त्यांच्यापासून अगदीच लांब आहेत.

भूदान चळवळीत सहभागी होऊन जमिनी सरकारला दान केलेली आणि तेथे ग्रामदान मंडळ सुरू केलेली केवळ हाताच्या बोटावर मोजता येणारी अशी २० गावे आहेत. त्यात शाहूवाडी तालुक्यातील बर्की गाव आहे. थोडे आडबाजूलाच बर्की वसले आहे. या गावातला धबधबा म्हणजे गावचा मूळ भूगोल आहे. भाग डोंगर-उतारांचा आहे. जंगल, छोट्या-छोट्या टेकड्या आणि भरपूर पाऊस यामुळे धबधबा तयार होण्याला पूरक असे वातावरण आहे. हा धबधबा पर्यटन वाढीसाठी कधी प्रसिद्ध होईल, असे ग्रामस्थांना वाटतच नव्हते. पण काही हौशी पर्यटकांनी हा धबधबा व्हॉट्स अॅपवर आणला आणि बघता-बघता धबधबा म्हणजे पावसाळ्यातले मुख्य आकर्षण ठरून गेला. संपूर्ण जिल्ह्यालाही माहीत नसलेला हा धबधबा मोबाईलमुळे घराघरात पोहोचला आणि बर्कीच्या दिशेने पर्यटकांचा ओघच सुरू झाला.

पावसाळा सुरू झाला की बर्की धबधबा हाच चर्चेचा विषय असतो. पण ज्या गावात धबधबा आहे ते बर्की गाव विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतले आहे, याचा कोणालाही गंध नसतो. गावातील शेती विकता येत नाही, त्यामुळे बर्कीत जागा घेऊन फार्महाऊस, हॉटेल, लॉजिंग कोणालाही काढता येत नाही. म्हणजेच येथे व्यवसाय करण्यासाठी बाहेरून कोणीही येऊ शकत नाही. भूदान चळवळ कशी राबवली गेली, हे शब्दशः गावात पहायला मिळू शकते, अशी गावाची रचना आहे. पण गावाची तशी ओळख समोर न येता धबधब्याचा लोट म्हणजे बर्की अशी ओळख झाली आहे आणि खरी ओळख धबधब्याच्या लोटातून वाहून गेली आहे.

बर्कीचे शेतकरी मोठ्या मनाचे बाबा रेडकर, आबा कांबळे, तुकाराम पाटील माळापुडे, बंडा पाटील पेंढाखळे, हे प्रमुख कार्यकर्ते ग्रामदान संकल्प पत्रिका भरून घेण्यासाठी प्रयत्न करत होते. भूदान करतान शेतकऱ्यांवर कोणी दडपशाही करते काय, यावरही कलेक्टरांचे लक्ष होते. ग्रामदान मंडळात सदस्य असतात. त्यांना ग्रामपंचायतीचे अधिकार असतात. हे ग्रामदान मंडळ ४ वर्षे मुदतीचे असते. आपल्या खासगी जमिनीवरचा मालकी हक्क सोडून जमीन गावाच्या मालकीची करणे याला फार मोठे मन लागते. पण दुसरी बाजू अश आहे की शासनाकडून काही तातडीने या गावासाठी कामे होत नाहीत. आता बर्की ग्रामदान मंडळावर प्रशासक आहे.

- आबा कांबळे, भूदान चळवळ, कार्यकर्ते. ग्रामदान मंडळाचे माजी अध्यक्ष, बर्की.