धोपेश्वराने प्रथमच अनुभवली चंद्राची शीतलता

पर्यटन व धार्मिक महत्त्व असलेल्या धोपेश्वर मंदिराची पुनर्बाधणी

TOURISM

Sudhakar Kashid

11/10/20251 min read

शाहूवाडी तालुक्यातील धोपेश्वर येथील प्राचीन महादेव मंदिराचे संवर्धन करण्यात आले, त्यानंतर धोपेश्वरला याच वर्षी मंदिर संवर्धनांतर्गत मंदिरासमोर दगडी खांब गोलाकार छत याच्या सहाय्याने स्वर्गमंडप उभारण्यात आला. आणि छताला ठेवण्यात आलेल्या वर्तुळाकार मोकळ्या जागेतून मंदिरात चंद्राच्या शीतल प्रकाशाने प्रवेश केला आणि काही क्षण तरी चंद्र आणि शाहूवाडीच्या धोपेश्वर मंदिर यांच्या भेटीचा पहिलाच अनोखा नजारा भाविकांनी त्रिपुरारी पौर्णिमिला अनुभवला, मंदिर संवर्धनाच्या निमित्ताने घोफेश्वरला स्वर्गमंडप आणि चंद्रदर्शनाचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेला वर्षातून याच एका रात्री खिद्रापूरच्या मंदिरात चंद्राचा प्रकाश पडतो. तो एक वेगळाच अनुभव असतो, तसाच प्रकाश या रात्री शाहूवाडी तालुक्यातील धोपेश्वर येथील धोपेश्वर मंदिराचे अंतरंग उजळवून गेला. खिद्रापूरच्या मंदिराच्या इतिहास सातव्या-आठव्या शतकापासूनचा आहे. धोपेश्वर मंदिराचाही तसाच आहे, पण धोपेश्वरला याचवर्षी मंदिर संवर्धनांतर्गत मंदिरासमोर दगडी खांब गोलाकार छत याच्या सहाय्याने स्वर्ग मंडप उभारण्यात आला. या छताला ठेवण्यात आलेल्या वर्तुळाकार मोकळ्या जागेतून मंदिरात चंद्राच्या शीतल प्रकाशाने प्रवेश केला आणि चंद्र आणि शाहूवाडीच्या धोपेश्वर मंदिर यांच्या भेटीचा पहिलाच अनोखा नजारा भाविकांनी अनुभवला.

धोपेश्वर हे ठिकाण कोल्हापूर ते अंबा मार्गावर शाहूवाडीच्या पुढे आहे. मुख्य रस्त्यापासून आत चार-पाच किलोमीटर दाट जंगलामध्ये धोपेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर सातव्या-आठव्या शतकातील आहे. पण या परिसरातला तुफान पाऊस आणि वातावरणामुळे मंदिराचे मूळ स्वरूप हरवले आहे. यावर्षी त्याची थोडीफार पुनर्बाधणी आणि संवर्धन करण्यात आले आणि स्वर्ग मंडप म्हणजे मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचा शितल चंद्रप्रकाश यावा, या भावचेने छत बांधताना गोलाकार आकार मोकळा ठेवण्यात आला. पहिल्याच वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्राचा शितल प्रकाश काही क्षण तरी मंदिराला उजळवून गेला. अर्थात खिद्रापूर मंदिराच्या किरणोत्सवाचे सर्वच पैलू या धोपेश्वरातील मंदिरात अनुभवता आले नाहीत. आणि खिद्रापूरसारखाच चंद्रप्रकाश या मंदिरातही अनुभवा, असा दावाही धोपेश्वरकरांचा नाही. पण मंदिराच्या संवर्धनाच्या निमित्ताने धोपेश्वरला स्वर्गमंडप आणि चंद्रदर्शनाचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

अलीकडे मंदिराचे संवर्धन करताना ते अधिकाधिक सोयीने युक्त करण्यावर भर असतो. रंग, फरशी, काचेची तावदाने, पंखे, सार्वजनिक हॉल, भक्त निवास, कुटी यावर त्यात भर असतो, कालानुरूप तो आवश्यकही आहे. पण धोपेश्वर म्हणजे पूर्ण आणि पूर्ण घनदाट जंगलात आणि एका धबधब्यालागत असलेल्या या प्राचीन मंदिराचे संवर्धन करताना आधुनिक चकचकीतपणा टाळला गेला. पटणार नाही, पण या मंदिराच्या भिंती आठ फूट रुंदीच्या आहेत. मंदिरालगत धबधबा आहे, त्यामुळे कायम गारवा आहे. वन्यजीवांचा वावर तर सांगण्यापलीकडचा आहे. रात्री एकही भाविक नसताना या परिसरातील शांतताही किती भयाण जाणवते, याचा अनुभव खूप वेगळा आहे.

महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते आणि मंदिराची मूळ बांधणी हेमाडपंथी आहे. या परिसराचे नैसर्गिक वैभव ध्यानात घेऊन आमदार डॉ. विनय कोरे यांनी राज्य शासनाचा निधी उपलब्ध केला. दगडी बांधकाम शैलीचे आर्किटेक्ट संतोष रामाने यांनी त्याचा आराखडा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधणी केली. दगडाची उपलब्धता सदाशिव कुंभार, राजेंद्र खोपरे यांनी केली. सचिन धोपेश्वरकर हे मंदिराचे पुजारी आहेत. मंदिराच्या पुनर्बाधणीचे काही काम अजून सुरू आहे. पण त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने या मंदिराच्या स्वर्ग मंडपात कलेकलेने आलेला चंद्राचा प्रकाश पहिल्यांदाच अनुभवण्यात आला आणि तो नजारा मंदिराला खूप वेगळे असे तेजा देऊन गेला.

 - सुधाकर काशीद, कोल्हापूर.

दगड आणि निसर्ग

अगदी खिद्रापूरसारखाच नजारा या मंदिराला आणणे शक्य नाही. कारण खिद्रापूर हे खिद्रापूरच आहे, त्याचे महत्त्व वेगळेच आहे. तरीपण आम्ही पुनर्बाधणी सर्व गावकरी, पुजारी, भक्त व नेतेमंडळींनी चर्चा करून दगडी स्वर्ग मंडप उभा केला. आणि त्रिपुरारी पौर्णिमेला त्याचा शीतल प्रकाश अनुभवला. धोपेश्वर मंदिर दाट जंगलात आहे. तिथले वन वैभव, पाण्याचे झरे खूप काही वेगळे आहेत. लोकांनी धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने खरोखरच ते अनुभवावेत.
- संतोष रामाणे, आर्किटेक्ट.