स्वावलंबनाचे वाटसरू
केवळ १८ घरांचं एक गाव, जे आज पर्यंत तालुक्या बाहेर देखील फारसं माहिती नव्हतं, ते गोठणे आज ग्राम पर्यटनाच्या माध्यमातून सर्व दूर आपली कीर्ती पसरवत आहे. विविध सामाजिक संस्था, व्यक्ती यांच्या मार्गदर्शनाने गोठाणेकरांनी एका आगळी-वेगळी वाट निवडली आहे. ग्राम पर्यटनातून रोजगार निर्मितीची वाट. त्या रोजगारातून ग्राम सेवा करण्याची वाट. सर्वाना एकत्रितपणे समृद्धीकडे नेणारी वाट.
- मंदार वैद्य, कोल्हापूर.


























घनदाट जंगलात निर्भयपणे राहणारे हे लोक. प्रकल्पग्रस्त. विस्थापित. चांदोली अभयारण्यातून शाहूवाडीतील वारूळ जवळ 'गोठणे' या नव्या जागी स्थलांतरित झालेले. कधीकाळाचे जंगलाचे राजे; आज रोजंदारी कामगार म्हणून जगणारे.
यांची पुण्याई आणि निसर्गदेवतेची यांच्यावरील असीम कृपा म्हणूनच की काय यांना स्वयंसिद्धा च्या कांचनताई परुळेकर भेटल्या, ट्रॅव्हेला चे कृष्णराव माळी भेटले. सर्व शक्यतांची पडताळणी झाली आणि गोठणे हे केवळ १८ घरांचे गाव 'पर्यटन ग्राम' करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या.
ग्रामीण महिलांच्या हाताला काम देणे हा कांचनताईंचा हातखंडा. थोड्या थोडक्या नव्हे तर ४५ ते ५० हजार महिलांना त्यांनी विविध उत्पादने बनवण्याचे कसब शिकवले. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली. शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांचे कार्य वर्षानुवर्षे सुरु आहे.
कृष्णराव मुळचे पर्यटन व्यावसायिक. जग फिरलेले. 'गोठणे' गावाचे वैशिष्ट्य त्यांनी अचूकपणे हेरले. 'गोठणे'ची ग्राम पर्यटनाच्या माध्यमातून वाटचाल सुरु करायचे ठरले.
'गोठणे ग्राम पर्यटन' ची दमदार सुरुवात झाली. दरम्यान महिलांसाठी प्रक्रिया उद्योगातील काही प्रशिक्षण शिबिरे स्वयंसिद्धा च्या माध्यमातून पार पडली. आता विषय होता काही मूलभूत सोयी-सुविधांचा; गावात विविध झाडांची लागवड करण्याचा. इथे किर्लोस्कर ऑइल इंजिन चे शरद आजगेकर पुढे सरसावले. त्यांनी साडेचार लाख रुपये सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिले. बघता बघता गोठणे हिरवाईने सजले. इथल्या मुलांच्या लाडक्या विदुलाताई त्यांना सतत पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे धडे देत असतात. त्यांच्या या उपक्रमाचे फलित म्हणजे आज इथली मुलं प्लास्टिक च्या पिशव्या वापरात नाहीत. कापडी पिशव्याच वापरतात.
आता छोट्या-मोठ्या गटाने पर्यटक यायला सुरुवात झाली. ४-५ जणांचं एखादं कुटुंब ते ३०-४० जणांचा मित्र-मैत्रिणींचा समूह येऊ लागला. इथल्या अस्सल ग्रामीण जीवनपद्धतीचा आनंद घेऊ लागला. येणार प्रत्येक जण आनंदाचा ठेवा सोबत घेऊन परंतु लागला. सांगोपांगी 'गोठणे ग्राम पर्यटन' उपक्रम अनेकांना माहिती होऊ लागला. गोठाणेकरांच्या हाताला काम मिळाले. स्वयंसिद्धा ने आखून दिलेल्या वाटेवर चालताना यश दिसू लागले.
गावरान खाद्य संस्कृती जपताना येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला इथे ग्रामीण ढंगाचा नाश्टा आणि जेवण दिले जाते. हे सर्व गोठाणेकरांच्या नेहमीच्या खाण्यातील पदार्थ. ग्राम फेरी, परसबागेला भेट, गाई-म्हशींचा गोठा, शेळ्या, कोंबडीची खुराडी या सगळ्याचं शहरातील लोकांना खूप कुतूहल आणि आकर्षण असतं. पर्यटकांना जे आवडतं ते सगळं इथे अनुभवायला मिळतं. आमची बच्चे कंपनी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला विशिष्ट प्रकारच्या ओरिगामीच्या कागदी टोप्या बनवून देते.
या वाटचालीमध्ये सोबत करणाऱ्या सर्वच मार्गदर्शकांचे, देणगीदारांचे, सहकाऱ्यांचे महत्व देखील नाकारता येणार नाही. गोठणेकरांनी एकदिलाने सुरु केलेल्या या आत्मनिर्भर उपक्रमाची दखल माध्यमांनी तर घेतलीच, सोबत रोटरी इंटरनॅशनल, रुद्रांश अकॅडमी यांच्या सारख्या प्रसिद्ध सामाजिक संस्थांनी देखील घेतली. स्वावलंबनाचं हे रुजलेलं रोप तुमच्यासारख्या सुहृद सोबत्यांच्या पाठबळावरच जोमाने नक्की वाढेल, बहरेल सुद्धा.
- मंदार वैद्य, कोल्हापूर
एकदिवसीय गोठणे ग्राम पर्यटन साठी संपर्क - 8390336391, 7796361053
Shahuwadi.com
Explore the bravery and natural beauty of Shahuwadi.
Contact
Get in touch
Email - info@shahuwadi.com
Mobile -
© 2025. All rights reserved.