स्वामीनिष्ठेची पावनखिंड वारी

प्रशासनाच्या वतीने सकाळी ९.०० वाजता नूतन तहसीलदार शुभांगी जाधव पावनखिंडीत वीर बाजीप्रभूंच्या समाधीस्थळावर पुष्पचक्र वाहून त्यांच्या ऐतिहासिक स्मृतीस वंदन करतील.

HISTORY OF SHAHUWADI

Rajendra Lad, Amba

7/12/20261 min read

१३ जुलै १६६० मध्ये घडलेला पन्हाळा–पावनखिंड–विशाळगडचा पराक्रम हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. "लाख मेले तरी चालतील; पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे" या विचारासाठी बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. शिवा काशीद यांनी स्वतःला शिवरायांच्या रूपात सादर करून स्वराज्याचे रक्षण केले. या त्यागातून स्वामीनिष्ठेचे सर्वोच्च मूल्य आजही प्रेरणा देते.

आज अनेक तरुण या ऐतिहासिक मार्गाचा अभ्यास करत इतिहासाशी नाते जोडत आहेत. ही वाट राष्ट्रप्रेम, शिस्त, त्याग आणि कर्तव्यभावनेचे संस्कार घडवणारी आहे. त्यामुळे या मार्गाकडे केवळ पर्यटन किंवा साहसी उपक्रम म्हणून न पाहता, तो राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा सांस्कृतिक वारसा म्हणून जपला पाहिजे.

पावनखिंड परिसरातील सह्याद्रीची जैवविविधता, घनदाट जंगले आणि ऐतिहासिक गावे ही आपल्या सांस्कृतिक व नैसर्गिक संपत्तीचा अविभाज्य भाग आहेत. मात्र स्थलांतर, मूलभूत सुविधांचा अभाव, उत्खनन, अतिक्रमण आणि वणव्यांच्या संकटामुळे हा परिसर धोक्यात आला आहे. इतिहास जपायचा असेल, तर त्या इतिहासाला जपणाऱ्या गावांचे अस्तित्वही टिकवावे लागेल.

या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांचे जीवनमान उंचावणे, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज, रोजगार आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणे ही काळाची गरज आहे. स्थानिकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेतल्याशिवाय या शौर्यभूमीचे संरक्षण शक्य होणार नाही.

पावनखिंड–मानोली परिसर जागतिक दर्जाची जैवविविधता लाभलेला आहे. या जंगलांचे संवर्धन म्हणजे केवळ पर्यावरणाचे नव्हे, तर शिवकालीन इतिहासाचेही संरक्षण होय. त्यामुळे उत्खनन, अतिक्रमण आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी समाज आणि शासन या दोघांनीही ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे.

गेल्या तीन दशकांत अनेक तरुणांनी या ऐतिहासिक मार्गावर प्रेरणादायी उपक्रम राबवले आहेत. वृक्षारोपण, स्वच्छता, शैक्षणिक साहित्य वाटप आणि इतिहास जनजागृती यांसारख्या विधायक कार्यातून स्वराज्याच्या मूल्यांचा जागर होत आहे. आणि हीच दिशा अधिक व्यापक होण्याची गरज आहे .

स्वामीनिष्ठेची पावनखिंड वारी म्हणजे केवळ चालण्याचा प्रवास नाही; ती विचारांची, मूल्यांची आणि राष्ट्रनिष्ठेची यात्रा आहे. बाजीप्रभूंच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन गड-किल्ले, निसर्ग, इतिहास आणि स्थानिक संस्कृती यांचे जतन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारली, तरच या पवित्र भूमीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत अभिमानाने पोहोचेल.

- श्री राजेंद्र लाड, आंबा.